नाताळचा आनंद द्यायला इस्रायलचा रॉय झाल्टसमन "सांता" क्रुज़मध्ये : त्यापूर्वीचे ४० तास
२५ डिसेंबर हा नाताळचा दिवस आनंद घेण्याचा आणि आनंद वाटण्याचा, असा आनंद जो कधी कुणाला उर्जा देतो तर कधी पाठीवर कौतुकाची थाप मारतो!
नाताळच्या दिवसाचे औचित्य साधुन त्रिरत्न प्रेरणा मंडळाची (TPM) जेष्ठ भगिनी संस्था ओब्झर्वर रिसर्च फ़ाऊंडेशनचे (ORF) अध्यक्ष श्री. सुधिंद्र कुलकर्णी यांचा मला फोन आला त्यांनी माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की, ' आपले स्नेही अनय जोगळेकर (ORFचे सहकारी व प्रसिद्धी माध्यम अधिकारी -इस्रायल वाणिज्य दूतावास) यांचे सहकारी आपणाकडे आले आहेत त्यांना काही कलाकारी मुंबईतील झोपडपट्टीत सादर करावयाची आहे. जर त्रिरत्न…. याला हो म्हणत असेल तर आपण त्यांचा कार्यक्रम सांताक्रुझमध्ये करूया?' क्षणात त्यांना हो म्हणालो. कार्यक्रम बुधवार २५ डिसेंबर २०१३ ला सायंकाळी ६.०० वाजताचा ठरला. एक रविवार वगळता दोन दिवसात कार्यक्रमाचे आयोजन करायचे होते. सोबतीला ORF चे प्रशासनप्रमुख धवल देसाई त्रिरत्नचे अध्यक्ष दिलीप कदम आणि दोन-तीन कार्यालयीन सहकारी……
'त्रिरत्न सांभाळत असलेल्या धर्मवीर संभाजी क्रिडांगणात मोठ्या मंचकावर कार्यक्रम व्हावा, यासाठी कमीतकमी पाचशे लोकांचा समुदाय असावा,' असा कुलकर्णी सरांचा आग्रह!
२२ डिसेंबरचा रविवार! इवेण्ट मेनेजमेंटवाल्या लोकांची शोधाशोध सुरु झाली. त्यातच धवल सरांचा रविवारी रात्री फोन आला. उद्या सकाळी ११.०० वाजता आपल्याला इस्रायल वाणिज्य दूतावासामध्ये जायचे आहे. तिथं अनय जोगळेकर आपली ओळख इस्रायली मेंटालिस्ट रॉय झाल्स्टमन यांच्याशी करून देणार आहे. सोमवारी आमचा प्रवास घड्याळाच्या काट्यावर सुरु झाला, कारण परदेशी पाहुणे भारतियांपेक्षा अधिक वक्तशीर असतात, असे ऐकून होतो.
इस्रायलच्या मुंबईतील कॉन्सुलेट कार्यालयाचे ४०/४५ मिनिटांचं सुरक्षा कवच पार करून चर्चेला बसल्यावर कळलं की, फक्त रॉय नव्हे तर त्यांच्याबरोबर इस्रायलचे मुंबईतील कॉन्सुल जनरल जोनाथन मिलर आणि डेप्युटी कॉन्सुल जनरल मतान झमीर हे देखील उपस्थित रहाणार आहेत.
बाहेर पडताना थोडी धाकधुकी घेवूनच बाहेर पडलो. कार्यक्रमाचं स्वरुप कसा असावं, पाहुणे म्हणुन कोणाला बोलवावे?, कोणी कुठे बसावं? आणि कुणाला कुठे बसवावे? यावर डोक्यात चक्र फिरू लागली. थोड 'अ'स्वास्थ वाटायला लागलं, पण अनयजींनी निमंत्रण पत्रिका बनवून द्यायची जबाबदारी घेतली होतीच. त्यातच इवेंट मेनेजमेंटवाले म्हणजे, 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला' असा महागातला प्रकार म्हणुन ORF ने त्याची जबाबदारी घ्यावी असेही ठरले, तसं म्हणायला आम्हाला अशा "भव्य" कार्यक्रमाचा अनुभव होता, म्हणजे त्रिरत्न ने २००९ मध्ये रसायन शास्त्रातले नॉबेल पुरस्कार विजेते, सर हेरोल्ड क्रोटो यांचा नेनो टेक्नोलोजीवर आधारीत जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम ORF द्वारा याच मैदानात आयोजित केला होता, त्याचे मेनेजमेंट झाले ते लोकल डेकोरेटरकडूनच! त्यामुळे थोडे बिंधास्तही होतो.
सोमवारचा पुर्ण दिवस इस्रायल कोन्स्युलेट आणि मान्यवरांची यादी तयार करण्यात संपत आला. संध्याकाळी पुन्हा धवलजींचा फोन……ORF चे इवेण्ट मेनेजमेंटवाले ६.३० वाजता त्रिरत्नमध्ये येताहेत. त्यांच्याबरोबर कार्यक्रम स्थळाचे सर्वेक्षण करून घेतले. तेवढ्या वेळात धवलजी सुध्दा त्रिरत्नमध्ये आले. चर्चा झाल्यावर दोनेक तासात इवेण्ट च्या खर्चाचा तपशील फोन वर कळवितो, असे सांगुन इवेंट मेनेजमेंटवाले निघून गेले. धवलजींनी उशिरापर्यंत त्रिरत्नमध्ये बसून अनय जोगळेकरांनी पाठविलेला आमंत्रणासंदर्भातील मेल तपासून फ़ायनल केला, पण पाहुण्यांना पाठविता आला नाही, कारण तो अंतिम मान्यतेसाठी कुलकर्णी सरांकडे पाठवायचा होता, ही जबाबदारी अनयजींची होती. कुलकर्णीसर याकाळात दिल्लीत होते.
रात्री उशिरा (साधारण ११. ३०) धवलजींचा SMS आला, इवेण्ट मेनेजमेण्टवाले अव्वाच्या सव्वा पैसे मागताहेत, जो आपला बजेट नाही आणि निर्णय घ्यायला समोर सरही ( सुधिंद्र कुलकर्णी) नाहीत. काय करुया?, मी त्यांना म्हटलं, "थांबा! कार्यक्रम करायचा की नाही, हे ठरवायला आपल्याकडे अजूनही वेळ आहे". शेवटचा प्रयत्न म्हणुन मी त्याचवेळी आमच्या लोकल डेकोरेटरला फ़ोन केला. त्याने त्याच्या "प्रोफेशनल" इवेण्ट मेनेजमेण्टवाल्याला विचारले, तर तो चक्क नाही म्हणाला. शेवटी हताश होऊन, "सकाळी बोलूया" असा Reply धवलजींना पाठविला.
२३ डिसेंबर सकाळी १०.०० वाजता आमंत्रणाचे फ़ायनल स्क्रिप्ट आले तेही बदल होऊन! त्यात फक्त बदल नव्हे तर कार्यक्रमांत वाढ झाली होती…. कार्यक्रमाच्या घोषवाक्यात, 'भारत - इस्रायल संबध वृध्दिंगत करण्यासाठी' असे होऊन, कार्यक्रमामध्ये शौचालय क्षेत्रात कार्य करणा-या समाजसेवकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करायचा!, असे ठरले होते.
मीही सकाळी आमचे अध्यक्ष दिलिप कदम यांच्याशी चर्चा केली. (जी प्रत्येक उपक्रमांबाबत आम्ही करतोच) त्यांना बरोबर घेवूनच आमच्या लोकल डेकोरेटरला फ़ोन करून बोलावून घेतले आणि, 'या कार्यक्रमासाठी तुम्हीच आमचे 'इवेण्ट मेनेजमेण्टवाले' असे म्हणुन कामाला लावले.
मंगळवार दुपारी १२.०० वाजल्यापासून मंडप, व्यासपीठ, स्क्रीन-प्रोजेक्टर, केमेरा, लाईट्स, साऊंड, लोकांसाठी तसेच विशेष आमंत्रित पाहुण्यांसाठी बसण्याची व्यवस्था, चहा- नास्ता, परिसराची स्वच्छता, पोस्टर-बेनर, स्थानिकांसाठी हेण्डबील, कार्यकर्त्यांसाठी ओळखपत्र (कारण स्थानिक पोलिसांकडुन तशी सुचना मिळाली होती.) ही सगळी तयारी करीत असतानाच मी संगणकाच्या आणि मोबाईलच्या माध्यमातून सत्कारमूर्तींना व मान्यवरांना संपर्क करीत होतो.
बुधवारी दुपार नंतर पोलिसांचे व त्यांच्या प्रमुखांचे आगमन व्हायला सुरवात झाली. सांताक्रूझ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. अरुण चव्हाण यांनी संपुर्ण परिसराचे सर्वेक्षण करून घेतले. त्यांच्या सोबत ही जबाबदारी TPM चे अध्यक्ष दिलीप कदम यांनी सांभाळली. थोड्याच वेळात पोलिस उपायुक्त श्री. चोरिंग दोरजे, अरुण चव्हाण साहेब यांना घेवून त्रिरत्नचे सचिव दयानंद मोहिते कार्यालयात आले, जवळपास पाऊण तास संस्थेची माहीती घेत असताना दोरजेसाहेबांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. एक सामान्य मंडळ असे 'अद्वितीय' कार्य करू शकते तेही शौचालय सांभाळणारे मंडळ! यावर त्यांचा सुरवातीस विश्वासच बसला नाही. आम्ही त्यांना माहिती देतच होतो, विविध पुरस्कार, मानांकन भागीदार संस्था, शासकीय विभाग या सर्वांच्या माध्यमातून एक मूलभूत सामाजिक संघटना समाजात कसे बदल घडवून आणु शकते हे त्यांना यशस्वी झालेल्या प्रयोगावरून दाखवून दिले. सरते शेवटी त्यांनी, 'इस्रायलच्या वाणिज्य दुतावासाचे कोन्सुल जनरल यांना झोपडपट्टीत आणणे ही साधी बाब नाही, असेच निस्वार्थी कार्य करीत रहा, माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत'. अशी शाबासकीही दिली.
कार्यक्रमास काही मिनिटांचा अवधी होता, आमची ORF ची टीम, धवल देसाई, पी. जी. दर्जीसर, सुनीलजी असे आमचे सहकारी आले. आमचे अध्यक्ष दिलीपजी कार्यक्रम स्थळी जातीने लक्ष देत होते. त्यांच्या सोबतीला प्रशांत पवार, प्रिया जाधव, संजय शिर्के, दिपांकर कदमसारखे अन्य सहकारीही होते. वेळे आधीच कार्यक्रमाचे आकर्षण रॉय झाल्टसमन व डेप्युटी कॉन्सुल जनरल मतान झमीर, यांचे आगमन झाले. पण लोकांचे आमच्या कार्यक्रमकडे येणंच होत नव्हते. याला कारणही तसेच होते. जवळपास ५०-१०० पोलिसांचा फौजाफाटा शिवाय त्यांच्या आधुनिक गाड्या, तपासणी यासर्वांमुळे लोकं भीत होती. काहींना आम्ही स्वत: हाताला धरून आत घेतलं, तेवढ्यात मोहितेंचा निरोप आला की, काही परदेशी पाहुणे पोलिसांच्या गराड्यात आपल्या कार्यालयात आले आहेत, तुम्ही ताबडतोब तिकडे निघून जा. लगोलग मी आमच्या कार्यालयात पोहचलो, तर तिथं इस्रायलचे मुंबईतील कॉन्सुल जनरल जोनाथन मिलर हे पोहचले होते. त्यांना घेवून कार्यक्रम स्थळी आलो. ६ वाजले तरी हवी त्या प्रमाणात लोक नव्हती. त्यातच कुलकर्णी सरांना ट्राफिकमुळे थोडा उशीर होणार होता. आमच्या बाजूने सर्व तयारी झाली होती, ती ही गेल्या ४० तासातली होती.
४० तासांच्या मेहनतीचा मोबदला मिळाला तोही व्याजासह:
सुधिंद्र्जींच्या आवेशातुन
कुलकर्णी सरांनी येताच इस्रायल कॉन्सुलेट जनरल जोनाथन मिलर आणि डेप्युटी कॉन्सुलेट जनरल मतान झमीर यांना घेवून TPM च्या Sanitation प्रकल्पावर आले. कार्यक्रमस्थळ ते प्रकल्पस्थळ या दिड मिनिटाच्या कालावधीत गेल्या १२ वर्षातील TPM च्या कार्याचा लेखाजोखा त्यांना सांगितला, प्रत्यक्ष प्रकल्प ठिकाणी आल्यावर TPM चे सार्वजनिक शौचालय आणि इस्रायलमध्ये होणारे नाविण्यपुर्ण अविष्कार यात विशेष फरक नाही हे पटवून दिले. मग ते स्वच्छता असो किंवा पाण्याचा पुनर्वापर असो की सोलार उर्जेचा वापर असो,कोणत्याही गोष्टीत TPM कमी नाही हे त्यांनी खास करून सागितले, तेही कॉन्सुलेट जनरलसह शौचालयाच्या परिसरात उभे राहून!
त्रिरत्न TPM ने शौचालयाचा वापर कसा सामाजिक कल्याणकारी योजना राबविण्यासाठी केला याचा पाढाच वाचला, प्रत्येक उपक्रम दाखविला, संगणक प्रशिक्षण केंद्र, पिठाची गिरण, पूरक पोषण आहाराचे किचन, तुळशी रोपांसाठीचे टेरेस गार्डन, सौर उर्जा प्रकल्प, महिलांच्या सुरक्षिततेची घेतलेली काळजी, याव्यतिरिक्त धर्मवीर संभाजी क्रिडांगण १०/१२ वर्षापूर्वी कसे होते, त्रिरत्न ने त्याचा कसा कायापालट केला हे जागेवर जावुन मिल्लर साहेबांना दाखविले, युवकांच्या विकासासाठी उभारलेली व्यायामशाळा, न्रुत्यशाळा, अभ्यासिका, वाचनालय, कचरा व्यवस्थापनातील संस्थेचे कार्य याबाबींचे विश्लेषण करताना कुलकर्णी सरांना पहाणे, त्यांच्या देहबोललीला न्याहाळणे म्हणजे परमानंदच असतो. कुलकर्णी सरांनी शौचालयावर लावलेले पंडीत जवाहरलाल नेहरू याचे वाक्य मिल्लर साहेबांना वाचून दाखविले, 'ज्या देशाची प्रसाधन व्यवस्था स्वच्छ व नीटनेटकी असेल तो देश प्रगतीच्या शिखरावर पोहचला असे सामाजावे, आणि हे वाचताना सरांच्या उच्चारातून देशाच्या प्रगतीचा लागलेला ध्यास जाणवत होता.
आम्ही आमच्या आयुष्यात अशी पहिली व्यक्ती पाहिली आहे की, जो एका प्रगत देशाच्या कॉन्सुलेट जनरलला झोपडपट्टिच्या सार्वजनिक शौचालयाची सफर घडवितो, आंतराष्ट्रीय व्यक्ती सोबत संपुर्ण कार्याक्रमादरम्यान फक्त आणि फक्त शौचालय याच विषयावर भाष्य करतो, आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमात शौचालय क्षेत्रातील स्वयंसेवकांचा सत्कार व्हायला पाहिजे अशी व्यवस्था करण्यास आम्हा सर्वांना भाग पाडतो! नाहीतर आमचे हे (?) त्यांना शौचालय बांधणे आणि दुरुस्त करणे एवढेच ठाऊक! असो,
त्रिरत्नच्या सचिवांनी (दयानंद मोहिते) कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पुढील सूत्रसंचालन करण्याकरीता माननीय श्री. अनय जोगळेकरांना आमंत्रित केले.
नाताळ, नाताळचा आनंद आणि 'सांता' रॉय झाल्टसमन यांची
"जादुई" दिव्यदृष्टी: स्वानुभवातून
अगदी ति-हाईत व्यक्तीने लपवून ठेवलेल्या पत्यांच्या नेमका क्रमांक सांगण्यापासून सुरवात होऊन चार बोटाच्या सहाय्याने ६०-७० किलो वजनाच्या व्यक्तींला उचलण्याचे कसब. हातावरचा चस्मा कोणताही स्पर्श न करता अलगद उडवायचा किंवा चार पाच व्यक्तींनी कागदावर चित्र काढुन लपवून ठेवायची व नंतर ती एकत्र करून रॉय झाल्टसमन यांनी ती, प्रत्येकाचा व्यक्तिविशेष सांगुन त्यांची त्यांना परत करायची. यासारख्या अनेक प्रयोगांची "माळ" रॉयनी सादर केली. या दिड तासात मला आवडलेली कलाकारी म्हणजे माझे घड्याळ ज्याची वेळ मी स्वत: बदलायची आणि रॉयने ते घड्याळ झाकल्या मुठीने त्यांच्या स्वत:च्या कोटाच्या खिशात ठेवायचे!
याप्रमाणे मी घड्याळाची वेळ बदलून (वेळ बदलताना मी त्यांच्या पासून जवळपास २०/२५ फुट अंतरावर होतो.) स्टेजवर नेऊन दिले. त्यांनीही ते (झाकल्या मुठीने) कोटाच्या खिशात ठेवले. कार्यक्रम संपण्याचा काही वेळ आधी त्यांनी मला ते जसे घेतले तसे परत केले आणि माझ्या हातात असतानादेखील त्यात किती वाजले आहेत ते अचूक सांगितले. यासर्व प्रात्याक्षिकासाठी त्यांनी आपले डोळे एका चिकटपट्टीने बंद करून त्यावर कापडी पट्टी बांधली होती.
मी जेव्हा त्यांना घड्याळ दिले तेव्हा ते तत्कालीन वेळेपेक्षा ३५ मिनिटे पुढे ठेवले होते. म्हणजे ८.०० ची खरी वेळ मी ८.३५ करून ठेवली होती, त्यांनी जेव्हा वेळ सांगितली तेव्हा घड्याळात ९.१० मिनिटे झाली होती.
अशा ब-याच गोष्टी डोळ्यावर पट्टी बांधुन केल्या. याला हातचलाखी म्हणावी की संमोहन! काही कळत नव्हते. अनुभवत होतो त्यांना लाभलेली अद्भुत शक्ती! जी दैवी नसून मन:शक्ती होती! स्वत:च्या मनावर ताबा मिळवुन हासिल केलेली!
इस्रायलचे मुंबईतील कॉन्सुल जनरल जोनाथन मिलर:
शौचालयं स्वयंसेवकांचे कौतुक
मिल्लर साहेबांनी येताना इस्रायल मध्ये हाताने चित्रकारिता केलेली मातीची भांडी स्वयंसेवकांना भेट द्यावयासा आणली होतीच शिवाय ORF यांच्या कडून प्रमाणपत्र ही तयार करण्यात आली होती. धनशक्ती, मन:शक्ती आणि श्रमशक्ती जनकल्याणासाठी वापरणा-या स्वयंसेवकांचा सत्कार या निमित्ताने प्रमाणपत्र व इस्रायली कलाकुसर केलेले भांडे भेट देवून करण्यात आला. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने सार्वजनिक शौचालयांच्या नीटनेटकेपणासाठी चांगले प्रयत्न केले आणि करीत आहेत.
मुंबईतील शौचालय व त्यांची निगा राखणे ही अशक्य गोष्ट आहे जी "रॉय झाल्टसमन" यांना ही जमणार नाही. कारण आमच्या मुंबई महापालिकेने केव्हाच हात टेकलेत! आणि म्हणुन की काय महापालिका जुन्या शौचालयांची डागडुजी न करता नव्या शौचालय उभारणीच्या प्रयत्नात आहे.
असो, निसर्ग रचेता त्यांना यश देवो!
सामाजिक क्षेत्रातील सत्कारमूर्ती स्वयंसेवकांमधे भांडूप तुल्शेतपाडा येथील झोपडपट्टितुन आलेल्या सौ. उषा कामत यांच्या घरी वापरात असलेले शौचालय हे त्यांच्यासाठी वरदान ठरले आहे. त्यांनी स्वत: तर असे शौचालय उभारलेच शिवाय आसपासच्या आपल्या शेजारी घरांना ही अशी सुविधा उपलबद्ध व्हावी म्हणुन कसोसीने पुढाकार घेतला. आज त्यांच्या झोपडपट्टीत ६०/७० लोकांच्या घरी आरोग्य (शौचालय) नांदते आहे.
सौ. अरुणा संतोष सुर्वे या पतीपत्नीने कांजुरगाव झोपडपट्टिच्या परिसरातील घरांमध्ये व्यक्तीगत शौचालय व सुस्वरूप वस्ती शौचालय व्हावे म्हणुन अविरत मेहनत घेतली. त्यांना मदत मिळवुन दिली प्रसंगी राजकीय लोकप्रतिनिधींना मदतीसाठी साकडंही घातले. आज त्यांच्या परिश्रमाच चीज होऊन तीनेकशे कुठुंब त्यांना दुआ देत आहेत.
सौ. नंदा सुरेश शिंदे सांताक्रूझ पूर्व गोळीबार येथून आलेल्या, फक्त स्वत: एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या पण वरिष्ठांकडुन हव्या त्या प्रमाणात सहकार्य न मिळाल्याने आणि असलेल्या शौचालयांची अवस्था न पहावल्यामुळे वर्षभरापुर्वी स्वखर्चाने त्याची स्वच्छता करून घेतली, आज लोकं स्वत:हून पुढे येवून लोकवर्गणीतून त्याची देखरेख करीत आहेत. ही चांगली सवय शिंदे यांच्या प्रयत्नातून पुढे आली आहे.
श्री. महादेव शिंदे धारावीतील एकवीरा मित्र मंडळाचे प्रमुख! वस्ती स्वच्छता प्रकल्पातून उभ्या राहिलेल्या सार्वजनिक शौचालयाची देखभाल यांच्या निरीक्षणाखाली गेल्या १०/१२ वर्षांपासून सुरु असून, येथिल स्वच्छता स्थानिक ४०० कुटुंबांचे आरोग्य सुयोग्य ठेवीत आहे. याच धारावी परिसरात काही अंतरावर असलेल्या एका वस्तीत महापालिकेला टीबी झालेल्या रुग्णांचे ६० टक्के प्रमाण आढळले परंतु एकवीरा……च्या आसपास सर्व काही आलबेल होते.
काही सामाजिक संस्था " पैसे द्या आणि वापरा" पद्धतीच्या शौचालयाची बांधणी आकर्षक कशी असेल, जास्तीत जास्त स्वच्छता/सुरक्षा कशी राखता येईल, यासाठी विशेष प्रयत्न करीता आहेत यापैकी राबडिया सेवक संघाचे "मंगल शौचालय" या शौचालयावर कार्यरत स्वच्छतादुत श्री. पन्ना यांना यासमयी गौरविण्यात आले.
सौ. सीमा रेडकर, मुंबई महानगरपालिकेतील "डायनेमिक" व्यक्तीमत्व! ज्यांनी निर्मला निकेतन सारख्या स्वयंसेवक घडविणा-या विद्यापिठातून पदवी अभ्यासक्रम पुर्ण करून टाटा सामाजिक विज्ञान केंद्रातून आपल्या समाजसेवेची सुरवात केली. सध्या महापालिकेत विशेष कार्यकारी अधिकारी असलेल्या रेडकरांची वस्ती शौचालय क्षेत्रात नवनविन प्रयोग करण्याची नेहमीच धडपड असते. त्यामुळे मेहनतीमधून आकारास आलेले त्रिरत्नचे पर्यावरणवादी वस्ती शौचालय, किंवा मुंबई पूर्व पश्चिम उपनगरातील झोपडपट्ट्या असो स्थानिक ठिकाणच्या मंडळांना अग्रक्रम देवून तरुणांना आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणण्याचे श्रेय त्यांना दिल्यास वावगे ठरू नये. शौचालय व्यवस्थेमध्ये व्यक्तीगत शौचालय, सार्वजनिक शौचालय अशा विविध स्तरांवर कोणते बदल व्हायला हवे आहेत, याचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये मांडण्याचे धैर्य रेडकरबाईचं दाखवू शकतात. त्यांच्या सहकार्याने सुरु केलेली SANITATIONOW ही चळवळ योग्य मार्गक्रमण करीत आहे, त्यात नक्कीच यशस्वी होऊ.
ज्या शौचालयाला आजपर्यंत जगाच्या कान्याकोप-यातून परदेशी पाहुण्यांनी आणि संपुर्ण भारतातून सामान्य नागरिक ते मुख्य सचिवांपर्यंत सर्वांनी येवून भेट दिली, नोंदवहीत सूचनांऐवजी कौतुकाचे चार शब्द लिहिले, आणि आम्हाला तुमच्याकडुन शिकण्यासारखे बरेच आहे, असे अभिप्राय दिले, अनेक पुरस्कार, मानंकन मिळाले, त्या वस्ती शौचालयाच्या स्वच्छतेची जबाबदारी गेल्या १० वर्षांपासून आपल्या दोन साथीदारांसह प्रामाणिकपणे सांभाळणारे श्री. मुस्तफा शेख यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
शौचालय आणि त्यात "अडकलेले" कार्यकर्ते यांना खरेतर मानाचे स्थान मिळायला हवे असते. पण आमच्याकडे तसा प्रघात नाही. उलटपक्षी एक प्रकारे ह्या क्षेत्रात काम करणारी माणसं ही "Untouchable" गणल्या जातात. मध्यंतरीच्या काळात मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्री. आर. ए. राजीव यांनी महापालिकेतील चतुर्थश्रेणी पासूनच्या कर्मचारी वर्गाचे त्याचबरोबर सामाजिक (झोपडपट्टी ) क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेल्या लोकांचे पुरस्काराच्या माध्यमातून कौतुक करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही एकाच वर्षी झाला. पुढे आलेल्या एकाही अधिकायाला असे वाटले नाही की, हा चांगला उपक्रम आहे. अविरत सुरु राहिल्यास नवनवे स्वयंसेवक तयार होतील. एवढी उदासीनता आज आपल्या प्रशासनात/ शासनात जन्माला आली आहे.
सन्माननीय कुलकर्णी साहेबांच्या कल्पनेतून पुढे आलेली "कौतुक" सोहळ्याची सुरवात "सांता"क्रुझ मध्ये व्हावी, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली. कुलकर्णी साहेबांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, 'ही सुरवात आपण "पहिल्यांदा" करतो आहोत; ती "अंतिम" होणार नाही, याची काळजी घ्यावयास हवी!' आणि म्हणुन त्रिरत्न नेहमी "अंतिम" व्यक्तीच्या जीवनमानाचा विचार "पहिल्यांदा" करतं!
या कार्यक्रमादरम्यान कुलकर्णी साहेबांनी इस्रायलचे मुंबईतील कॉन्सुल जनरल जोनाथन मिलर यांच्या समोर केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले, "भारत-इस्रायल मैत्रीच्या वाढीची सुरवात इस्रायलच्या नवनविन प्रयोगांना मुंबईत त्रिरत्न ने शौचालय प्रकल्पात स्थान देवून केली, याचा उल्लेख करायला मला जास्त आवडेल. इस्रायल मध्ये मनुष्यसंख्या (मुंबईच्या लोकसंख्येपेक्षा) कमी असताना देखील आहेत त्या माणसांच्या बळाच्या जोरावर टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात इस्रायल जगाच्या नकाशावर अव्वल नंबर आहे."
कॉन्सुल जनरल जोनाथन मिलर यांनी त्रिरत्नच्या कामाचे मूल्यमापन करताना,' त्रिरत्न ही संस्था आपल्या एकोप्यातुन आणि परिश्रमातून नवनव्या कल्पनांना सकारात्मक दृष्टीने उपयोगात आणुन, शौचालय सारखे हे एक उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. या उदाहरणातून आपण व्यक्तीगत, कुटुंब, समाज, शहर, देश आणि जगापर्यंत असे टप्प्याटप्प्याने अनेक बदल घडवून आणु शकतो.' असे म्हणाले.
याप्रसंगी त्रिरत्नच्या पाठीराख्या सौ. सीमा रेडकरांनी इस्रायल भेटीचा स्वानुभव सांगताना,'त्रिरत्नच्या या सर्व प्रयोगांमागे मी स्वत: अनुभवलेल्या इस्त्रायल मधील नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रेरणा आहे, आणि त्या गोष्टींचा यशस्वी प्रयोग त्रिरत्नच्या माध्यमातून मला करता आला. त्रिरत्नच्या स्वयंसेवकांना जर का इस्रायलला भेट देण्याचा योग आला तर इस्रायलमधील नाविन्यपूर्ण कल्पनांचा त्यांच्यावर निश्चितच चांगला परिणाम होऊन, त्यांच्याकडुन मुंबईत याही पेक्षा वेगळे काही पहावयास मिळेल, याची मला खात्री आहे.' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दोन तास चाललेल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनय जोगळेकरांकडून ऐकताना एक वेगळाच आनंद मिळत होता. सर्वसामान्यांना कळेल अश्या सौम्य शब्दात प्रसारित करीत असलेले रॉय झाल्टसमन यांच्या इंग्रजीचे भाषांतर फार सुरेख होते, हे संभाषण कार्यक्रमाची "भरपूर" मजा घेताघेता ते करीत होते, हे विशेष!
धवल देसाई ह्यांनी ज्या विश्वासाने इवेंट मेनेजमेण्टची जबाबदारी संस्थेवर सोपविली आणि सोबत येवून आमच्याकडून पुर्ण करून घेतली त्यास खरचं शब्द नाहीत.
पी. जी. दर्जी साहेब आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचे स्केनर! त्यांच्या नजरेतून कोणतीच "कमी" रहात नाही, याच कार्यक्रमाचा बघा ना…। पाहुण्यांसमोरे ठेवलेल्या छोट्या टेबलवरील जागा फारच रिकामी वाटत होती म्हणुन त्यांनी लगोलग फुलदाणी विकत आणली, त्याही दोन! अशी धडपडणारी मनं ओब्झरवर (ORF) मध्ये आहेत, ज्यांचा आम्हाला नेहमी स्नेह लाभत राहिला आहे.
हा लेख फारच उशिरा लिहायला घेतला त्याचे कारण ही तसेच आहे, एकतर कुलकर्णी साहेबांनी सांगितले म्हणुन आणि दुसरे मला नक्की काय लिहायचे आहे हे सुचत नव्हते म्हणुन!
सरते शेवटी कार्यक्रमाचा ४० तासांचा प्रवास लिहूया असा निर्णय केला, आणि जसा वेळ मिळत गेला तसे लिहित गेलो! लिहायचे काय टाईप करीत गेलो. आपणास पसंत आला तर मला नक्कीच धन्य वाटेल, पण पसंतीस नाही उतरला तर मी माझ्या स्नेह्यांना सलाम करण्यासाठी शब्दांचा वापर केला, हे समाधान मिळेल.
हा कार्यक्रम सन्माननीय श्री सुधिंद्र कुलकर्णी यांच्या मनाप्रमाणे झाला, याचाच आम्हाला जास्त आनंद आहे.
(व्रुत्तसंकलन - श्री. दयानंद जाधव, कार्यकारी अध्यक्ष, त्रिरत्न प्रेरणा मंडळ )
डावीकडून इस्रायली डेप्युटी कोन्सुलेत मतान झमीर, त्रिरत्नचे अध्यक्ष दिलिप कदम, बृमुंमनपा च्या विशेष कार्यकारी अधिकारी सौ. सीमा रेडकर, इस्रायली कोन्सुलेत जनरल जोनाथन मिल्लर आणि ऑब्झरवर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी उपस्थितांना संबोधित करताना
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे धर्मवीर संभाजी क्रिडांगण, खोतवाडी, सांताक्रूझ
इस्रायली कलावंत रॉय झाल्टसमन, मेंटालिस्ट
बोटांच्या सहाय्याने सुमेधला उचलताना डावी कडून
रॉय, सुनिल, अलोक, सन्नी मध्यभागी सुमेध