Friday, 22 August 2014

Mahatma Gandhi Center For Sanitation, Cleanliness and Community Health

Mahatma Gandhi Center For Sanitation, Cleanliness and Community Health 

शौच          शुचिता          स्वास्थ

प्रस्थापित राजकारण्यांसाठी माननिय प्रधानमंत्री म्हणजे मैदानातील नवखा प्रतिस्पर्धी आहे, असे वाटत असतानाच, मा. प्रधानमंत्र्यांनी (सामान्य लोकांच्या कल्याणार्थ) दुर्लक्षित असलेल्या Sanitation सारख्या विषयावर भारतियांचे लक्ष वेधले. यासाठी मा. प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ला निवडला आणि "Sanitation ला दुर्लक्षुन चालणार नाही, माझे सरकार या क्षेत्रात येत्या २०१९ पर्यंत भरीव कार्य करून दाखविणारच," असे मोठ्या धीरगंभीर शब्दात जाहीर केले.

एवढ्या महत्वपूर्ण "व्यासपीठावरून" असे विधान करणा-या दोन महान प्रभूती भारताच्या इतिहासात आपल्याला दिसतात, दोन्ही व्यक्ती भारताचे पंतप्रधान. पैकी एक म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी भारताच्या पहिल्या लोकसभेतील भाषणात म्हटले होते की, "A country in which every citizen has access to a clean Toilet has reached the pinnacle of Progress!" (ज्या देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध असते तो देश विकासाच्या शिखरावर पोहचला असे समजावे!) यावरून आजही भारत पुर्ण विकसित देश आहे, असे म्हणणे धारीष्टाचे ठरते, हा भाग वेगळा!  

आजचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदिजींनी त्याचाच पुनरुच्चार केला. मोदीजींनी एक पाऊल पुढे जावून २ ऑक्टोबर २०१९ ही "सीमा"च आखुन घेतली. आणि विकासाच्या इमारतीची जी आकृती पंडितजींनी आखली होती, त्या इमारतीचा पाया म्हणजे परिपूर्ण आणि सुस्वच्छ शौचालयं! असे समिकरणंच मांडले. शाळेतील होणारी विद्यार्थ्यांची गळती व शहर-गावांत होणारी उघड्यावरील हागणदारी, ह्याच बाबी विकासात प्रमुख अडथळा असण्याचे सुतोवाच मा. प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणातून जाणविले. 

स्वच्छतेचा हा कार्यक्रम देशात चालणा-या इतर कार्यक्रमांपेक्षा अधिक गतीने चालावा यासाठी सर्वच क्षेत्रांतील लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. असे जाहीर केले. अर्थात मोदींनी "समय-सीमा" निश्चितीसाठी जो दिवस निवडला तो गांधी जयंतीचा. याचे कारण असे की, महात्मा गांधींना जसे देशाचे स्वातंत्र्य हवे होते तसेच "अस्वच्छतेतुन मुक्ती" सुध्दा हवी होती. यासाठी त्यांनी स्वत:ला Scavenger असे म्हणवुन घेण्यात धन्यता मानली. गांधीजींचं आचरण प्रमाण मानून भारताच्या दोन्ही पंतप्रधानांनी स्वच्छतेला आपले कर्तव्य बनविले.

परंतु त्रिरत्न प्रेरणा मंडळाबाबत सांगायचे झाले, तर गांधी, नेहरू वा मोदी असा कोणताही व्यक्तिप्रभाव आमच्यावर कधी राहिलाच नाही, आणि या महानुभावांचे हे विचार कधी कानावर आलेच नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणांचा सारांश आमच्या डोक्यात कायम राहिला होता; त्यांनी अस्पृश्यता/अविकसितपणा यांची कारणीमिमांसा करताना स्वच्छता आणि नीट्नेटकेपणा याला महत्व का दिले पाहिजे, याची उदाहरणं आपल्या भाषणात दिलेली आठवणीत होती.

त्रिरत्न प्रेरणा मंडळ शौचालय क्षेत्रात गेल्या १२/१५ वर्षाहून अधिक काळापासून कार्यरत आहे. (परिस्थितीनुरूप आम्हाला कार्यरत व्हावेच लागले.)  या कार्यकाळापूर्वी शासन/प्रशासनाच्या शौचालयाबाबत असलेल्या "उदासीन" प्रवृत्तीचे आम्ही कित्येकदा शिकारही झालो. त्यामुळं इस्पितळं, दवाखाना आम्हाला जवळचा नातेवाईक म्हणजे त्याच्याकडे जाणे येणे अधिक! त्यावेळी आम्ही ज्या राजकीय समाजसेवकां(?)च्या सानिध्यात होतो त्यांना तर "शौचालय" हा विषय अंगावर घाण उडवून घेण्यासारखा प्रकार वाटायचा. त्यातील एका तरुण राजकीय समाजसुधारकाने १९८५ साली काढलेला "टिनपाट मोर्चा" हा अपवाद म्हणुन म्हटल्यास आमच्या कळा कोणी समजून घेतल्याच नाही. ही एक घटना सुध्दा आम्हाला शौचालय क्षेत्रात काम करायला प्रवृत्त करून गेली असावी. आता "तो" समाजसुधारक करोड रुपयाच्या घरात रहातो आहे. असो,

श्रीयुत सुधींद्र कुलकर्णी (Former OSD, PMO & Chairman of ORF, Mumbai )  यांची आमची ओळख म्हणजे त्यांच्या पंतप्रधान कार्यालयातून बाहेर पडल्यानंतरची. आज जवळपास ९/१० वर्षांची. त्यांनी आम्हाला आमच्या शौचालयाशी निगडीत कार्यासह "Lime-Light"मध्ये आणण्याचे काम 'Indian Express' च्या वृत्तपत्रात 'कव्हरस्टोरी' लिहून केले. 

जेव्हा कुलकर्णीजी  ओब्झर्वर रिसर्च फ़ाऊंडेशनचे चेअरमेन झाले तेव्हा पासुन  (चार/पाच वर्षांपासून) त्रिरत्नला आपल्या संस्थेचे सहयोगी बनविले. त्रिरत्न प्रेरणा मंडळ  व भारतातील  विचार मंच म्हणुन अग्रगण्य असणारी संस्था ओब्झर्वर रिसर्च फ़ाऊंडेशन, मुंबई यांनी मिळून, Sanitation व त्यासंबंधीत प्रश्नांवर अविरत काम करण्यासाठी सांताक्रुज (पश्चिम) येथे Mahatma Gandhi Center For Sanitation, Cleanliness and Community Health (शौच, शुचिता, स्वास्थ) या प्रकल्पाची उभारणी केली आहे. केंद्राचे विशिष्ट असे की, माननीय प्रधानमंत्री यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात घोषणा करताच दोन तासांच्या आत प्रत्यक्ष आकारात आलेले भारतातले पहिले Sanitation, Cleanliness and Community Health (शौच, शुचिता, स्वास्थ) केंद्र आहे. त्यामुळे या केंद्राचा आभिमान आम्ही बाळगणे यात कोणाचे दुमत असू नये, असे आम्हाला वाटते. 

शेवटी व्यक्तीपूजेत "माहीर" असा भारत घडविण्यापेक्षा सर्वसमावेक्षक विकास घडविण्यासाठी भारतातल्या महान राष्ट्रपुरुषांचे आणि लोकशाहीने दिलेल्या आसनाधित शासनाचे, धर्मनिरपेक्ष, लोककल्याणार्थ संयुक्तिक असलेले विचार कृतीत आणण्यासाठी जर काही प्रयत्न आपण करू शकलो, तर आपण आपल्या भारतासाठी काहीतरी केल्याचे समाधान तर लाभेलच; शिवाय आपल्याच "वारसांना " आपण स्वातंत्र्यानंतरच्या आणखी एका "मुक्तीपथावरील राहगीर" वाटुन, त्यांनी आपली तसबीर राष्ट्रभक्त म्हणून लावल्यास तुम्हा-आम्हाला आश्चर्य वाटायला नको!  

- दयानंद जाधव 
    
त्रिरत्न प्रेरणा मंडळ व ओब्झर्वर रिसर्च फ़ाऊंडेशन, मुंबई यांनी मिळून उभारलेले सांताक्रुज (पश्चिम) येथिल Mahatma Gandhi Center For Sanitation, Cleanliness and Community Health (शौच, शुचिता, स्वास्थ) उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगीची काही क्षणचित्रं !